1. आयुर्वेद-एक समृद्ध परंपरा
आयुष्यातील अनेक समस्यांची उत्तरं शोधत असताना माणूस जसा नव्या तंत्राचा आधार घेत असतो तसाच तो कधी आपल्या भूतकाळातही डोकावतो आणि हा भूतकाळ जर संपन्न असेल तर त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतात किंवा कधी कधी हा भूतकाळ त्याच्या मनात अनेक नवे प्रश्नही निर्माण करतो. आयुर्वेद हे असे एक शास्त्र आहे ज्याच्या बद्दल आपल्याला हेच जाणवत असतं. अनेक व्याधी, त्यांच्यावरील उपाय आणि त्याचे मार्गदर्शन इतक्या प्राचीन काळापासून शिस्तबद्धरित्या एकत्रित करणारे अन्य कोणतेही शास्त्र नसेल.मात्र जस जसे या शास्त्राच्या आधाराला आपण जातो तेव्हा येणा-या अनुकूल अनुभवासोबतच आपले कुतूहलही मोठ्या प्रमाणात चाळवले जाते.त्यातच अलिकडे पाश्चात्य मंडळींचे आपल्या या शास्त्राकडे कुतूहलाने पाहणे,त्याचे कौतुक करणे यामुळे आपल्यालाही आयुर्वेद नव्याने जाणून घ्यावासा वाटतो..हे शास्त्र तसे अथांग सागराप्रमाणेच आहे पण तरी त्याच्याविषयीच्या काही महत्त्वपूर्ण आणि तितक्याच उद्बोधक गोष्टी इतरांना माहीत करून देणे हे आयुर्वेदावर प्रेम करणा-या माझ्या सारख्यां व्यक्तीला महत्त्वाचे आणि आनंदाचे वाटते म्हणूनच हा लेखन प्रपंच.
ऋषीमुनीची समृद्ध परंपरा असणा-या या संस्कृतीतील वेद म्हणजे विविध विषयांवरची भाष्य़ं आहेत.आयुर्वेद हा माणासाच्या एकुणच स्वास्थ्यावर भाष्य करतो. मात्र हे स्वास्थ्य केवळ शरीराचे नाही तर आत्मा मन शरीर या तिन्हीच्या स्वास्थ्याची काळजी आयुर्वेद घेतो.जागतिक आरोग्य संघटनेने जी निरोगीपणाची व्याख्या आता रूढ केली आहे ज्यात मनाच्या स्वास्थ्याचा अंतर्भाव नव्याने करण्यात आला..ती व्याख्या आयुर्वेदाने अनेक शतकांआधीच मानली होती.मन आत्मा शरीर इंद्रीय यांच्या प्रसन्नतेचा विचार आयुर्वेदाने खूप आधी करून ठेवलेला आहे.
आपण आता जे काही आजार आणि त्यावर होणारे उपचार बघतो त्यांचं स्वरूप साधारण असं असतं की आजारी पडल्यावर रोगी व्यक्तीला डौक्टरची आठवण येते मग डौक्टर त्याला औषध देतात.पण आयुर्वेद त्यापुढे जाऊन माणसाने आजारी न पडता शक्यतो निरोगी कसे रहावे याचा विचार करताना दिसते.त्यातही एखादी व्यक्ती आजारी पडलीच तर आयुर्वेद रोगाची चिकीत्सा करण्यापेक्षा रोग्याची चिकीत्सा करताना दिसते.प्रत्येक व्यक्ती तिचा आहार विहार शारीर रचना इतकी भिन्न असते.एकच औषध सर्वांवर कसे काम करणार?पण याचा विचार आयुर्वेदाने फ़ार आधीच करून ठेवलेला दिसतो.आणि म्हणूनच आताच्या काळात ही आयुर्वेदीक चिकीत्सा पद्धती महत्वाची ठरते कारण व्यक्तीला समोर ठेऊन उपाय करणारी ही एकमेव चिकीत्सा पद्धती असावी.
विविध व्याधी त्यावरचे आयुर्वेदाने सांगीतलेले उपाय यांकडे आपण टप्प्याटप्प्याने येऊच पण मूळात आयुर्वेद माणासाच्या निरोगी राहण्याकडे बारकाईने कसं बघतं ते आपण पाहू.आयुर्वेद माणसाला निरोगी राहण्यासाठी काही नियमांचे पालन करायला सांगतं.हे नियम दोन प्रकारचे आहेत.एक म्हणजे दिनचर्येनुसार नियम आणि दुसरे म्हणजे ऋतूचर्येनुसार पाळायचे नियम.यातही वयानुसारी नियम वेगळे आणि प्रदेशानुसारी वेगळे.पण या नियमांचे पालन करूनही काही व्याधी संभवतात त्यांचे देखिल आयुर्वेद वर्गीकरण करतो."काय बाल ग्रह उर्ध्वांग शल्य द्रष्ट्रा जरा वृषण" असे हे प्रकार मानण्यात आले आहेत.
सर्वसाधारण शारीर आजार, स्त्री शिशुंचे आजार, मानेवरिल अर्थात उर्ध्वांगाचे आजार, शल्यचिकीत्सा अर्थात सर्जरी,विषप्रयोगावरील उपाय,वृद्धांपकाळातील आजारांचा विचार,आणि लैगिक समस्यांचे निराकरण अशा व्याधींच्या सर्वांगाचा विचार आयुर्वेद करतं. आयुर्वेदाविषयी हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आयुर्वेदाविषयी असणारे अनेक गैरसमज जे आजतागायत रूढ आहेत.आयुर्वेद म्हणजे काय हे सांगताना आयुर्वेद म्हणजे काय नाही हे सांगायची वेळ आज आली आहे.कारण जडीबुटी औषध विकणारा बाबा आणि आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणार वैद्य यांच्यातील भेद सर्वांनाच माहित असतो असे नाही.हे आपल्या पूर्वजांनी अतिशय मेहनतीने, अभ्यासाने आपल्यासाठी प्रगत केलेले शास्त्र आहे.त्याचा प्रचार व प्रसार हा निश्चितच व्हायला हवा.दुर्दैवाने आपल्यावर खूप मोठा काळ परकीय सत्तांचे साम्राज्य होते.त्यातील मोगलांनी नालंदा,तक्षशीला सारख्या विद्यापीठांतून चरक आदी प्रभृतींनी केलेल्या संशोधनावरील ग्रंथभाष्य अक्षरश: जाळून टाकले तर ब्रिटीशांनी गुरू शिष्य परंपरेला खंडीत करताना आयुर्वेदाच्या अभ्यासालाच पायबंद घातला.पण या सगळ्या संकटांना पूरून उरत आज जे काही आयुर्वेदाचे ज्ञान उपलब्ध आहे ते देखिल सागराइतकेच अथांग आहे.अशा या शास्त्राचे मूळरूप त्याची उपयुक्तता ही अधिकाधिक लोकांपर्यंत यावी हाच या संवादाचा उद्देश.आयुर्वेदाची ही विविध रूप शोधत अनुभवत पुढे जाताना आपल्या पूर्वजांच्या संशोधनाचे,त्यांच्या उपचार पद्धती ज्या आजही तितक्याच प्रभावी ठरत आहेत त्या उपचारांचे संस्कार लेखणीतून आपल्या मनावर बिंबवत ही लेखमाला साकारताना नक्कीच खूप काही नव्याने गवसेल हीच अपेक्षा.तुम्हांला आणि मला देखिल...
2. आयुर्वेद आणि काही समज गैर समज.
आयुर्वेद हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर येते हजारो वर्षांची परंपरा जिचा अर्थातच आपल्याला अभिमान असतो.पण जेव्हा एखादी उपचार पद्धती जगभर मान्यता पावते तेव्हा तिच्या जोडीने येतात काही समज आणि गैरसमज.हे समज कधी कधी मूळ स्वरूपाला इतक्या वेगळ्या पद्धतीने मांडतात की त्यामुळे त्या शास्त्राला उणेपण येऊ शकतं.आणि म्हणूनच थोडंसं जाणून घेऊया आयुर्वेदाविषयीच्या काही समजांविषयी.
आयुर्वेदाकडे नेहमी दोन दृष्टीकोनातून पाहिलं जातं.एकतर आजीबाईचा बटवा अर्थात घरगुती तोडगे सांगणारं एक शास्त्रं म्हणून किंवा कोणताच तरणोपाय न उरल्यावर वापरायची उपचार पद्धती म्हणून. अनेक मंडळी सहज भेटल्यावर सुद्धा विचारताना आढळतात की आमच्या मुलाला अमुक अमुक होतय तर सुंठ किंवा तत्सम घरगुती औषध देऊ का? मुळात आयुर्वेद हा असा सहज जाता जाता औषध सांगून बरं करणारा सहजसाध्य प्रकार नाही.या शास्त्राची स्वत:ची एक रोगचिकीत्सा पद्धती आहे.स्वतंत्र शास्त्र आहे.विशिष्ट आहार,व्यायाम,औषध यांच्या अचूक अंदाजातून रोग्याला रोगमुक्त करू पाहाणारी ही एक व्यवस्था आहे. दुसरा जो दृष्टीकोन आहे की इतर उपचार पद्धतीने हात टेकल्यावर आयुर्वेद अशक्यप्राय रोगांवर उपचार करतो,तो या समजाला जन्म देतो की दुर्धर रोग आयुर्वेदामुळे जादूप्रमाणे दूर होतात.हे वास्तव मान्य करून की अनेक दुर्धर रोगांवर आयुर्वेद खूप गुणकारी उपचार करू शकतो, मला आवर्जून हे सांगावसं वाटतं की आयुर्वेदिक वैद्य हा जादूगार नाही तो असलाच तर वैद्यकीय किमयागार आहे.
आयुर्वेदाविषयी असे समज निर्माण होण्यामागे असतात अशी काही मंडळी जी अभ्यासमार्ग न अवलंबता फ़क्त ऐकीव माहितीवरून किंवा घरात पूर्वी कोणीतरी वैद्य होऊन गेलंय त्यांच्या पूर्वपुण्याईवर आयुर्वेदाविषयी भाष्य करू पाहतात.आणि त्या उपचारपद्धतीला सपक करून टाकतात.माझा एक डौक्टर मित्र एकदा म्हणाला होता की मी जेव्हा डौक्टरीची परिक्षा पास झालो तेव्हा मला वेगवेगळ्या रोगावरची १०० औषधं कळली.पण १० वर्षांच्या प्रैक्टीसनंतर असे १०० रोग कळले ज्यांच्यावर कोणतेच उपाय नाहीत.शास्त्रोक्त अभ्यासाने वास्तवाचं असं भान आल्यावर उगाच एखाद्या शास्त्राविषयी फ़ुगवून सांगण्य़ाची,पर्यायाने त्या शास्त्राला बदनाम करायची हिंमत होत नाही.अर्थात आयुर्वेदिक उपचार घेताना ते आपण कोणाकड्न घेतो यावर त्या शास्त्राच्या अनुभवाची प्रचिती अवलंबून असते.
आयुर्वेदाने व्याधींचं वर्गीकरण चार प्रकारे केलं आहे.पहिले सुखसाध्य व्याधी..ज्या कमीत कमी पथ्यात सहज ब-या होतात.दुस-या आहेत कष्टसाध्य व्याधी ज्या अनेक दिवसांच्या पथ्यानंतर मोठ्या कष्टाने ब-या होतात.तिस-या आहेत याप्य व्याधी ज्या तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता पण त्यासासाठी नियमित पथ्य,व्यायाम, औषध यांची आवश्यकता असते.जसे की अस्थमा वा मधुमेह.आणि चौथा प्रकार आहे असाध्य व्याधी ज्यावर कोणताही उपचार नाही.मात्र तरीही अशा व्याधींच्या लक्षणांची चिकीत्सा आयुर्वेद करतं आणि जरी रोग्याची आयुर्मर्यादा वाढवता आली नाही तरी त्या रूग्णाला कमीत कमी त्रास होईल याची काळजी आयुर्वेद घेतं.
हे वर्गीकरण सांगण्य़ाचा हेतू इतकाच की आयुर्वेदानेच काही रोग हे असाध्य असतात हे मान्य केलं आहे याची जाणीव व्हावी.त्यामुळे आयुर्वेदाने अमूक एक असाध्य आजार दूर करून दाखवतो अशा वल्गना करणा-यांची सत्यासत्यता पडताळणं आवश्यक ठरतं.कारण जर गुण नाही आला तर लोक त्या व्यक्तीला दोषी न धरता शास्त्राला उणेपणा देतात, जे अयोग्य आहे.
आयुर्वेदाने उपचार पद्धतींत काही विशिष्ट पद्धतींचा वापर जाणीवपूर्वक केलेला आहे.पण त्याविषयी सुद्धा अनेकदा आपल्या संभ्रम दिसून येतो.जसे की आयुर्वेदिक औषधात होणारा धातूंचा वापर किडणीसाठी घातक असतो.पण हा देखिल एक गैरसमज आहे.कारण या औषधात असणारे धातूं हे प्रत्यक्ष नसतात तर ते धातूंचे भस्म असते.ज्यांचा कुठल्याही अवयवावर अजिबात विपरीत परिणाम होत नाही.योग्य वैद्याच्या देखरेखीखाली योग्य त-हेने तयार भस्मांचा, रसौषधींचा वापर हा गुणकारीच असतो.चरक काळात मुख्य भर हा वनौषधीवरच होता पण नंतरच्या काळात धातूंचा वापर होऊ लागला.कारण ह्या भस्माचे गूण हे "अल्पमात्रोपयोगित्त्वा"असे असतात.कमी कालावधीत कमी मात्रेत कार्यगती वाढवणारी ही भस्म वा रसौषधी शतकानुशतकं आपण वापरत आलो आहोत. ब्रिटीश् भारतात येईपर्यंत आयुर्वेदिक औषधांचा वापरच भारतात होत होता हे वास्तव आहे. जर त्याचा किडणीवर दुष्परिणाम होत असता तर इतकी वर्षे त्यांचा वापर झाला असता का?धातूंचे भस्म अपायकारक तेव्हाच ठरू शकते जर ते योग्य पद्धतीने बनवले गेले नाही. पण तो दोष निर्मिकाचा.शास्त्राचा नाही.
आयुर्वेदावर अशा प्रकारचे आरोप करणा-यांनी हे आवर्जून लक्षात घेतलं पाहीजे की अत्यंत वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून आयुर्वेदिक भस्म तयार होत असतात.धातूंचं भस्म झाल्यावर त्याची पूर्ण लकाकी गेली वा नाही हे तपासलं जातं. अगदी सोन्याचं भस्म देखिल विटेच्या पावडरीप्रमाणे दिसू लागेपर्यंत त्याची शाहानिशा केली जाते.कारण धातूची लकाकी निघून जाणे तीच भस्माची कसोटी असते. भस्म योग्य झाले आहे वा नाही याच्या अन्य काही कसोट्यादेखिल आयुर्वेद देतं.जसं की भस्म बोटांच्या चिमटीत घेतल्यावर ते बोटांच्या रेषात पूर्णपणे जाऊन बसलं पाहीजे.ही झाली रेषापूर्णत्वाची कसोटी.दुसरी एक कसोटी म्हणजे वारितर.भस्म पाण्यात तरंगलं पाहीजे.इतर धातूच नव्हे तर अगदी लोखंडाचं भस्मही.जर ते पाण्याच्या तळाशी गेलं तर त्याचा अर्थ ते योग्य त-हेने तयार झालेले नाही.ह्या झाल्या काही सर्वसामान्य कसोट्या.पण काही विशिष्ट कसोट्याही आहेत जसेकी ताम्रभस्म अर्थात तांब्याचे भस्म योग्य त-हेने तयार आहे वा नाही हे पाहण्यासाठी त्यावर आंबट ताक ओतून पाहिलं जातं.जर ते हिरवट पडलं तर याचा अर्थ ते योग्य नाही.कारण पक्कं भस्म हिरवट पडत नाही.अशी तावूनसुलाखून परिक्षा झाल्यावरच भस्माला मान्यता मिळते.
जे भस्माचं तेच औषधी वनस्पतींचं.कोणत्या ऋतूंमध्ये काय गोळा करायचं,मूळ,खोड वा अन्य भाग कधी काढायचे,जी वनस्पती तोडली जात आहे तिची माती कशी आहे,झाडाला कोणताही रोग नाही ना?कोणत्या दिशेची फ़ांदी तोडायची याची संपूर्ण चिकीत्सा करून मगच या वनस्पतींना खुडलं जातं.इतकच नाही तर पूर्वीचे वैद्य आदल्या दिवशी जाऊन त्या झाडाची प्रार्थनाही करायचे की आम्ही अमूक उपचारासाठी तुझा हा अवयव नेत आहोत तर सहकार्य कर..कारण त्यामुळे झाड आपला अधिकतर जीवनरस त्या दिशेने पाठवते अशी समजूत होती.
इतक्या काटेकोरपणे काम करणारी अन्य एखादी औषध पद्धती असेल असं वाटत नाही.त्यामुळे हा औषधांचा विपरित परिणामांचा मुद्दा गैरलागू ठरतो.
या औषधांच्या बाबतीतलाच आणखी एक समज म्हणजे आयुर्वेदिक औषधांचा परिणाम व्हायला खूप वेळ लागतो.यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सामान्यत: आयुर्वेदिक वैद्याकडे येणारा रोगी हा खूप वर्षं जुना एखादा आजार घेऊन येतो.पण रोगाच्या अगदी सुरूवातीच्या काळातच जर आयुर्वेदिक वैद्याकडे रोग्याला आणलं गेलं तर त्यावर नेमका तातडीने गुण आणणारा उपायही शक्य आहे.अगदी हृदयरोगावरसुद्धा आयुर्वेदिक पद्धतीने तातडीने उपचार केल्यास गुण येऊ शकतो.तत्काळ गुण येणारे अनेक उपाय आयुर्वेदानेही दिलेले आहेत.आजकाल तत्काळ गुण यावा याकरता जशी जीभेच्या खाली ठेवण्यासाठी म्हणून गोळी दिली जाते तसेच आयुर्वेदातही पोटाचा मार्ग टाळून नाकाद्वारे अर्थात नस्य पद्धतीने किंवा तेलात औषध उकळून त्याची बस्ती देण्याच्या पद्धतीने तत्काळ उपचारपद्धतींचा वापर प्रचलित आहे.काही औषधं सहाणेवर उगाळून टाळूवर चोळण्यास दिली जातात ती देखिल तातडीची उपचारपद्धतीच असते जी औषधाला थेट रक्तात मिसळण्यास मदत करते.त्यामुळे आयुर्वेदिक उपचारपद्धती म्हणजे महिनोंमहिने चालणारा उपचार हा समजही चुकीचा आहे.
आयुर्वेदिक औषधांकडे पाहण्याचा आणखी एक चुकीचा समज म्हणजे या औषधांना अंतीम तिथी अर्थात एक्सपायरी डेट नसते.पण तसं नसतं.विशिष्ट कालावधीनंतर आयुर्वेदिक औषधं खाल्ल्याने त्यांचा अपाय झाला नाही तरी उपायाचा प्रभावही कमी होतो.कुठलं औषध किती काळ घ्यावं याचे देखिल निर्देश आहेत. एका श्लोकात म्हटले आहे
अर्थात वनस्पतीज औषधी द्रव्य एक वर्ष वापरावीत.चूर्ण दोन महिने,गुटिका अर्थात गोळ्या, च्यवनप्राश सारखी अवलेह एक वर्ष वापरावीत,सिद्ध तेल-तूप चार महिन्यापर्यंत वापरणे प्रभावी ठरते.थोडक्या प्रक्रियेत तयार होणारी लघुपाकी औषधं एक वर्षापर्यंत वापरावी.मात्र धातू,अरिष्ट,आसवं रसायन, जितकी जुनी तितकी चांगली.तुळशी वा आल्यासारखे रस मात्र काढल्या काढल्या ताबडतोब घ्यावेत. यातून आपल्या पूर्वजांनी केलेला बारिक अभ्यासच दिसून येतो..
आयुर्वेदाकडे एका बाबतीत आवर्जून अंगूलीनिर्देश केला जातो तो म्हणजे ज्या रोगांचा उल्ल्लेख प्राचीन काळात नाही जसे की किडणी,एचाआयव्ही,कैन्सर त्यावर ही उपचारपद्धती कशी काम करू शकते?यावर चरकाचे उत्तर आहे की रोगाची चिकीत्सा केल्यावर वात पित्त कफ़ या त्रिशक्तीत कुठे बिघाड आहे हे जाणता येते त्यातला बिघाड ओळखता आला की रोग्याची चिकीत्सा आपोआप होणार.हा विचार ज्ञात अज्ञात समस्त व्याधींना लागू पडतो.त्यामुळे आताच्या काळातील रोगांची चिकीत्सादेखिल यानुसार आयुर्वेदाच्या कक्षेत येते.
आयुर्वेदाकडे शंकेने पाहणारे जितके आहेत तितकेच श्रद्धेने पाहणारेही आहेत पण कधी कधी अतिरेकी श्रद्धा देखिल चुकीची ठरते.मला निर्देश करायचा आहे अशा व्यक्तींकडे जे गरज असो वा नसो आयुर्वेदिक औषधांच्या सेवनाचा अपाय नाही या भावनेने रोज चूर्ण खाणं पसंत करतात.रोज त्रिफळाचूर्ण खाणारे अनेक असतील पण त्याची दुसरी बाजू अशी की या अशा चूर्णांची सवय शरीराला लागल्यावर त्याशिवाय तरणोपाय उरत नाही.असे औषधांवर पूर्णत:अवंलंबणे देखिल हे शास्त्र सूचवत नाही.
या सगळ्याकडे पाहताना एक गोष्ट नक्की जाणवते की आपल्या पूर्वजांनी अत्यंत अभ्यासाने आणि विशेष म्हणजे निसर्गचक्राला धरून विकसित केलेली ही अभ्यासपद्धती अतिशय परिणामकारक आहे पण अनेकदा समज गैरसमजाच्या धुक्याआड या उपचार पद्धतीला ठेवताना आपण पूर्वापार आलेल्या ठेव्याचेच नाही तर स्वत:चेही नुकसान करत असतो.इतक्या हजारो वर्षांपूर्वीच्या या शास्त्राला योग्य अयोग्याच्या तराजूत तोलताना समज गैरसमजाच्या धुक्यातून बाहेर काढूया आणि पुन्हा एकदा आपल्या मनाच्या चश्म्याची काच स्वच्छ करून त्याकडे पाहूया.